batmi 24 taas online :
केवळ गाडी काढण्यावरून एका उच्चशिक्षित तरुणाच्या स्प्लिन या नाजूक भागावर सतत हाताने मारून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. त्यामुळे शहर हादरून गेले आहे. पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून, यातील एकाने पुरावा नष्ट करण्यासाठी चक्क मृतदेह एका मोटर्स या वाहनांच्या दुकानात ठेवला असल्याचेही समोर आले आहे.
नरेंद्र रघुनाथ खैरे (वय 33, रा. आंबेगाव बुद्रुक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी युवराज जम्बु कांबळे, ओंकार अशोक रिठे, वैभव पोपट अदाटे, मनोज दत्तात्रय सूर्यवंशी आणि विष्णू कचरू कदम यांना अटक केली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र हा उच्च शिक्षित असून तो एका खासगी कंपनीत काम करत होता. तर आरोपी यांना दारूचे व्यसन आहे.
दरम्यान भूमकर चौकातील प्रसिद्ध बारच्यासमोरील जागेत त्यांनी गाडी पार्क केली होती. रविवारी सायंकाळी पार्क केलेली गाडी काढण्यावरून त्याच्याशी युवराज, ओंकार, वैभव व मनोज यांनी वाद घातला. त्यानंतर नरेंद्र याच्या स्प्लिन या नाजूक भागावर सतत हाताने ठोस मारून त्याचा खून केला. त्यानंतर हे आरोपी पसार झाले. नंतर विष्णू कदम याने ही घटना त्याच्या समोर झालेली असताना देखील त्याने ही माहिती पोलिसांना किंवा कोणाला दिली नाही. तर तीन अनोळखी व्यक्तींनी मृतदेह हा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने श्री साई मोटर्स या दुकानात ठेवला. दरम्यान नरेंद्र याच्या जवळ असणारी रोकड, मोबाईल आणि पाकीट घेऊन आरोपींनी पळ काढला. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीची पडताळणी केली आणि घटना उघड झाली. दरम्यान या घटनेने परिसर हादरून गेला आहे.
0 Comments