Pandharpur : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरात पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीवरील नवीन पुलाबरोबरच जुन्या दगडी पुलाचाही वारकरी भाविक पायी जाण्या-येण्यासाठी वापर करतात. सध्या जुन्या दगडी पुलावर खड्डे पडले असून संरक्षक कठडे नसल्याने पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावर, पालखी तळांवर तसेच पंढरपूर शहरात येणाऱ्या भाविकांना प्रशासनाकडून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. या सोयी-सुविधांची पाहणी श्री.शंभरकर यांनी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी गजानन गुरव, आप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, बसवराज शिवपुरे, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, जगदिश निंबाळकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक केशव घोडके, उप-कार्यकारी अभियंता डी.व्ही.मुखडे, नगर अभियंता श्री.पवार, स्वच्छता निरीक्षक शरद वाघमारे तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत 65 एकर येथे मोठ्या प्रमाणात दिंड्या मुक्कामी असतात. या दिंड्यासमवेत येणारे तसेच इतर जिल्ह्यातून तीन रस्ता मार्गे येणारे वारकरी नवीन पुलासह जुन्या दगडी पुलाचा वापर करीत असतात. भाविकांच्या सुरक्षतेसाठी पुलाच्या दुरुस्तीसह, भक्कम संरक्षक कठडे करावेत. नदी पात्रातील खड्डे बुजविण्याबरोबरच झाडे झुडपे, मोठे पडलेले दगड काढावेत. नदीपात्रात भाविकांना मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जादा नळ जोडणी करावी. घाटांची आवश्यक ठिकाणी दुरुस्ती तसेच संपूर्ण स्वच्छता करावी. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जुना दगडी पुल, चंद्रभागा नदी पात्र, घाट, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर, बाजीराव विहिर, भंडीशेगांव पालखी तळ तसेच नियोजित सोपानकाका महाराज पालखी तळ तसेच तोंडले बोंडले पालखी मार्गावरील पुलाची पाहणी करुन आवश्यक सूचना संबंधितांना यावेळी दिल्या.
आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्रातात महाव्दार घाटावरुन पादुका स्नानासाठी दिंड्या तसेच वारकरी भाविक मोठ्या प्रमाणात जात असल्याने या घाटावर गर्दीचे प्रमाण जास्त असते. या घाटावरील लोखंडी रेलींग काही ठिकाणी निघाल्यामुळे त्याची दुरुस्ती तत्काळ करावी, जेणेकरून भाविकांना त्याचा आधार घेता येईल. तसेच ज्या ठिकाणी नवीन घाट बांधणीचे कामे अपुर्ण आहेत त्या ठिकाणी बॅरेकेंटींग करावे, अशा सूचना श्रीमती सातपुते यांनी दिल्या.
पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्गावर व मुक्कामाच्या प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. तसेच 65 एकर, पत्राशेड, नदीपात्र, मंदीर येथे देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
0 Comments