उद्योजकांच्या घशात जाणारा विठ्ठल कारखाना युवराज पाटलांनीच वाचवला - गणेश पाटील

पंढरपूर (प्रतिनिधी) युवराज पाटील यांनी विरोध केला नसता तर, कारखाना सभासदांच्या हातून गेला असता. कारखाना देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांनीही हे कबूल केले आहे. युवराज पाटील यांनी विरोध केल्यामुळेच हे षडयंत्र थांबले, आणि कारखाना सभासदांच्या मालकीत राहिला असल्याचे मत गणेश पाटील यांनी करकंब येथील प्रचार सभेत व्यक्त केले. यावेळी युवराज पाटील, ॲड. दीपक पवार यांच्यासह करकंब आणि परिसरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.

विठ्ठलच्या निवडणुकीतील प्रचाराने वेग घेतला आहे. युवराज पाटील गटाने प्रचारात मुसंडी मारल्याचे चित्र आहे. या गटाच्या प्रचारा निमित्त गुरुवारी शेवते, बादलकोट ,सांगवी, बार्डी , नेमतवाडी आणि करकंब आदी ठिकाणी बैठकी पार पडल्या. युवराज पाटील, गणेश पाटील आणि ॲड. दीपक पवार यांचे जंगी स्वागत करकंब येथे करण्यात आले .यानंतर झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला.

कारखान्याचे प्रस्थापित चेअरमन भगीरथ भालके यांच्याबरोबर युवराज पाटील हेही सत्तेवर होते, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे विठ्ठल परिवार फोडण्याचे षड्यंत्र युवराज पाटील करीत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. याचा जोरदार समाचार गणेश पाटील यांनी घेतला.

एका विरोधकांने कारखाना मातीत मिळवला . हे दोघेही कारखान्याचा सौदा करावयास निघाले होते. युवराज पाटील यांनी विरोध केल्यामुळेच हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला आहे. सभासदांनी ही गोष्ट ध्यानात घ्यावी. कारखाना हातून जाऊ नये, यासाठी युवराज दादांना चेअरमनपदही देण्याची तयारी विरोधकांनी केली होती. कारखाना रसातळाला नेऊ पाहणाऱ्यांना साथ देणे योग्य वाटले नाही, म्हणूनच आम्ही आपणाससमोर उभे आहोत, असे मत गणेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी करकंब परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शेतकरी सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

भगीरथ भालके आणि अभिजीत पाटील यांनी मिळून कारखान्याचे होत्याचे नव्हते करण्याचे ठरवले होते. युवराज पाटील यांनी विरोध केल्याने कारखाना आज मितीस जागेवर आहे. किंबहुना सभासदांच्या मालकीचा राहिला आहे. कारखान्यावर सभासदांची मालकी राहण्यासाठी सभासदांनी युवराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे मत गणेश पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments