Pandharpur Live News:
विठ्ठल कारखान्याला कर्जाच्या खाईत ढकलून कारखान्याचा सौदा करण्याचे काम भगीरथ भालके केले होते. आणि याच कारखान्याची बोली लावण्याचे काम अभिजित पाटील यांनी केले होते. ही गोष्ट सभासदांना ठाऊकही नव्हती. निवडणुकीत सुरू असलेल्या साठमारीत ही गोष्ट उघड झाली , सभासदांचे सभासदत्व डावलू पाहणाऱ्या या दोन्ही नेत्यांना सभासदांनीच धडा शिकवावा, असे मत ॲड. दीपक पवार यांनी व्यक्त केले. कासेगाव येथील प्रचार सभेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी युवराज पाटील, गणेश पाटील, प्रशांत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. श्री विठ्ठल अण्णाभाऊ विकास पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे. कासेगाव येथील प्रचार सभेत ॲड. दीपक पवार यांनी दोन्ही विरोधी पॅनलवर कडाडून टीका केली. वीस वर्षे निवडणुकांमध्ये चहापाणी करून कारखाना गोत्यात आणला आहे. आणि पुन्हा तेच चिन्ह घेऊन निवडणूक लढवू पहात आहेत, अशी टीका भालके यांच्यावर केली.
कारखाना चालवणारा माणूस या नावाखाली निवडणूक लढवणारा माणूस अतिशय धूर्त आहे. आरशात बुंदी लाडू खाऊ घालणाऱ्या माणसासारखे त्याचे काम आहे. लाडू तर दिसणार परंतु खायला कधीच मिळणार नाही. याच पद्धतीने तो निवडणूक रिंगणात उभा आहे. हे दोन्ही बहाद्दर कारखान्याचा सौदा करू पाहत होते.सोलापूरमधील हॉटेलमध्ये बसून विठ्ठल कारखान्याचा सौदा केला जात होता. भगीरथ भालके कारखाना देत होते, तर अभिजीत पाटील कारखाना घेणार होते. ही गोष्ट या दोघांनीही आपल्याच तोंडाने कबूल केली आहे. हा सौदा झाला असता तर, सभासदाचे सभासदत्व राहणार नव्हते. हे सर्व सभासदांच्या परस्पर होत होते.
आता कारखान्याची निवडणूक लागली आणि दोघेही सभासदांसमोर हात पसरत आहेत. या दोघांनाही दूरवर ठेवण्याचे काम सभासदांनी करावे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. श्री विठ्ठल अण्णाभाऊ विकास पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन ॲड. दीपक पवार यांनी यावेळी केले.
विठ्ठल कारखान्याची गोडी कोणास किती आहे ? हे सभासदांना पुरते ठाऊक झाले आहे. सभासदांना वाऱ्यावर सोडून पुढील दोन पॅनलप्रमुख सौदा करू लागले होते. निवडणूक लागल्याने आता सभासदांसमोर हात पसरू लागले आहेत. सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे मत ॲड. दीपक पवार यांनी कासेगाव येथील प्रचार सभेत केले.
0 Comments