टोल फ्री क्रमांक 108 वरती संपर्क करा -प्रांताधिकारी गजानन गुरव
पंढरपूर (दि.25):- कोरोना संकटाच्या कालावधीनंतर दोन वर्षानी आषाढी यात्रा भरत आहे. या आषाढी यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपूर शहर व परिसरात तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन सेवा डायल 108 यांच्या 75 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, वैद्यकीय सेवेसाठी टोल फ्री क्रमांक 108 वरती संपर्क करा असे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपान महाराज पायी पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी व भाविकांना पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापासून पंढरपूर पर्यंत 75 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच शहरामध्ये आषाढी एकादशीच्या आधीपासून 15 स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भाविकांना रुग्णवाहिकेची गरज भासल्यास 108 टोल फ्री क्रमांवर कॉल केल्यास तात्काळ रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 04 जुलै 2022 तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 05 जुलै 2022 रोजी आगमन होणार आहे जिल्ह्यात वारकरी भाविकांना अधिकच्या वैद्यकीय सुविधेची उपलब्धता व्हावी यासाठी पालखी मार्गावर व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय पथकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी गुरव यांनी दिली.
आषाढी यात्रा कालावधीत वारकऱ्यांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी बी.व्ही.जी व महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा डायल 108 यांच्यावतीने पालखी मार्ग, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपूर शहरात जिल्हानिहाय रुग्णवाहिकेचे नियोजन करण्यात आले असून, आवश्यक ठिकाणी स्वतत्र रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वारी कालावधीत भाविकांना 108 डायलची सुविधा प्रभावीपणे देता यावी यासाठी पंढरपूर शहरामध्ये नियत्रंण कक्ष सुरु करण्यात आला असून, डायल 108 ची सुविधा नि:शुल्क 24 तास सेवा उपलब्ध करण्यात आली असल्याचे बी.व्ही.जी ग्रुपचे सोलापूर जिल्हा व्यवस्थापक डॉ.अनिल काळे यांनी सांगितेले
तसेच या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, स्वेरी कॉलेजचे एन.एस.एस चे विद्यार्थी, पॅरामेडीकल कॉलजचे विद्यार्थी यांना प्रथोमोचार कार्यशाळा घेवून डायल 108 च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले आहे. सन 2014 ते 2021 पर्यंत वर्षनिहाय अतिजोखमीच्या एकूण 3 हजार 583 रुग्णांना वारी कालावधीत डायल 108 ची आपत्कालीन वैद्यकीय सेवा देऊन जीवनदान दिल्याचे डॉ.काळे यांनी सांगितले.
0 Comments