आरोपी पतीला त्याच्या पत्नीला झालेल्या आघातासाठी 10 हजार रुपये देण्यास सांगितलंय.
मुंबई : अपशब्द वापरून पत्नीचा अपमान केल्याप्रकरणी एका खटल्यात पती दोषी आढळल्यानंतर, न्यायदंडाधिकारी न्यायालयानं (Court) अंधेरीतील (Andheri Mumbai) एका 35 वर्षीय व्यक्तीला वर्षभराची कारावासाची शिक्षा सुनावलीय.
दरम्यान, आरोपीला चांगल्या वागणुकीच्या बंधनावर सोडण्यास नकार देताना महानगर दंडाधिकारी एसएआर सईद म्हणाले, स्त्रीचं चारित्र्य, प्रतिष्ठा आणि स्वाभिमान याबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह शब्द उच्चारणं ही सामाजिक आणि नैतिक चूक आहे. या घटनेमुळं माहिती देणार्या पत्नीला मानसिक त्रास सहन करावा लागलाय. अशा प्रकारचे अनैतिक हावभाव, एखाद्या पुरुषाचा स्त्रीकडं बघण्याचा दृष्टिकोन याबाबतचा विचार करुन कोर्टानं हा निर्णय घेतलाय.
आरोपी पतीला त्याच्या पत्नीला झालेल्या आघातासाठी 10,000 रुपये देण्याचेही आदेश दिले होते. त्यानं पत्नीला अश्लील, अपमानास्पद मजकूर पाठवला होता, त्यानंतर तिनं त्याच्याकडं तक्रारही केली. मात्र, त्यानं तिच्याशी गैरवर्तन सुरुच ठेवलं. पतीला शिक्षा देताना न्यायदंडाधिकारी म्हणाले, आरोपींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, त्यानं केलेल्या गुन्ह्यामुळं केवळ पीडितेच्या जीवनातच ठेच पोहोचली नाही, तर तिला मानसिक आघातही सहन करावा लागलाय. अशा पीडितेनं दिलेला पुरावा हा साक्षीदारापेक्षा मोठी असल्याचं कोर्टानं म्हटलंय. दरम्यान, आरोपी पतीकडून फोन, मेमरी कार्ड जप्त करण्यात आलंय. महिलेनं कोर्टात सांगितलं की, तिचं लग्न 2018 मध्ये आरोपीशी (पती) झालं होतं आणि ती त्याची 'दुसरी पत्नी' होती. आरोपी पती दोन्ही पत्नींसोबत राहत होता. आरोपीसोबत तिचे संबंध तीव्र झाल्यानंतर, त्यानं तिच्यावर सेक्स वर्कर असल्याचा आरोप केला आणि तिला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली, असं तिनं नमूद केलं.
0 Comments