जळगाव : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पुतळ्याचं दहन केलं.
विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात तापलेले वातावरण शांत होण्याची कोणतीही चिन्हं सध्या दिसत नाहीये. शिवसेनेचे 39 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे ही घटना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील बंडाळी सर्वांसमोर आली. अनेक आमदार सूरत आणि नंतर गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटाला सामील झाले आहेत. काही आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही शिंदे गटाला सामील झाले आहे. यामध्ये सेनेचे महत्वाचे नेते गुलाबराव पाटील, दिपक केसरकर यांच्यानंतर काल उदय सामंत देखील शिंदे गटात सहभागी झाले.
यानंतर शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदारांची संख्या 39 इतकी झाली आहे. शिंदे गटात आणखी 9 अपक्ष देखील आहेत. त्यामुळे 48 आमदारांचे संख्याबळ शिंदे गटाकडे आहे.
दरम्यान, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद जळगावात उमटून आले. शिवसैनिकांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध केला. मुर्दाबाद मुर्दाबाद..संजय राऊत मुर्दाबाब, गुलाबभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली.
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले होते की, पाटलाला पुन्हा पानटपरी चालवावी लागेल. या विरोधात जिल्ह्यात पडसाद उमटत आहेत.
0 Comments