नानांच्या काळातही विठ्ठलचा कारभार भगीरथ भालकेंकडेच होता ...

 


पंढरपूर (प्रतिनिधी)

विठ्ठलच्या निवडणुकीत भगीरथ भालके यांनी लबाड बोलण्याची सिमा सोडली आहे. अकरा वर्षे विठ्ठलचा कारभार त्यांच्याच हाती होता. कारखान्यातील कुठला पैसा कुठे गाढायचा ?

यावर त्यांनी मास्टरकी मिळवली आहे. तीन वर्षात मिळालेल्या २१७ कोटींमध्ये कारखाना कधीच सुरू झाला असता , हे सर्व जिरवण्यासाठी आता लबाड बोलत सुटले आहेत , अशी टीका युवराज पाटील यांनी भगीरथ भालके यांच्यावर केली. ते फुलचिंचोली येथील प्रचारसभेत बोलत होते.

याप्रसंगी गणेश पाटील, ॲड. दीपक पवार, अमरजीत पाटील आदींसह फुलचिंचोली येथील प्रतिष्ठित सभासद उपस्थित होते. विठ्ठलची निवडणूक रंगतदार बनत चालली आहे. कधी नव्हे ती चौरंगी लढत या निवडणुकीत होत आहे. युवराज पाटील यांच्या श्री विठ्ठल अण्णाभाऊ विकास पॅनलने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. शनिवारी सायंकाळी फुलचिंचोली येथे प्रचारसभा पार पडली. या सभेत युवराज पाटील यांनी भगीरथ भालके यांच्यावर  तोफ डागली.

युवराज पाटलांनी कर्ज मिळू दिले नाही, साखर व्यापाऱ्यांना दमबाजी केली, असे विविध आरोप भगीरथ भालके प्रचारसभांमधून करत सुटले आहेत. यावर बोलताना युवराज पाटील यांनी सांगितले की, या निवडणुकीत बंद पडलेला कारखाना सुरु कसा करणार ? सभासदांची कशी देणार ? यावर बोलण्याची गरज आहे, परंतु आपला कारभार लपवण्यासाठी भगीरथ भालके लबाड बोलत सुटले आहेत.

कै. भारत भालके आमदार झाल्यापासून कारखान्यावर जात येत नव्हते. तेव्हापासूनच संचालक भगीरथ भालके यांच्या हाती कारभार होता. कारखान्याकडे आलेला पैसा कुठे ठेवायचा ? आणि कुठे खपवायचा ? हे काम त्यांच्याकडेच होते. गेल्या तीन वर्षात कारखान्यास २१६ कोटी रुपये कर्जरूपाने मिळाले. हे पैसे कुठे गेले ? हे भगीरथ भालके यांनाच ठाऊक आहे . एवढे पैसे मिळूनही सभासदांची देणी दिली नाहीत. कारखाना सुरू करणे तर दूरची गोष्ट, असेही त्यांनी सांगितले. ही निवडणूक महत्वाची आहे. यावरच कारखान्याचे भवितव्य अवलंबून आहे. आता फसलात तर चित्र वेगळे दिसेल .कदाचित कारखान्यावर पाऊलही ठेवता येणार नाही, असा गर्भित इशारा युवराज पाटील यांनी सभासदांना दिला.

याप्रसंगी फुलचिंचोली येथील शंकर गायकवाड, वसंत गायकवाड, पांडुरंग पापरकर, मारुती वाघ, अण्णासाहेब परांडे, नाना पाटील यांच्यासह या परिसरातील इतर मान्यवर उपस्थित होते

भारतनाना आमदार होते, त्या वेळेपासून विठ्ठल कारखान्याचा कारभार भगीरथ भालकेच पाहत होते. विठ्ठल कारखान्याचा आर्थिक व्यवहार त्यांच्याच हाती होता. कुठला पैसा कुठे खपवायचा , हे त्यांना चांगले कळत होते. पैसा खपवल्यामुळेच कारखाना आर्थिक संकटात सापडला. ही सर्व जबाबदारी झटकण्यासाठी आता निवडणुकीत लबाड बोलत सुटले आहेत ,असा प्रहार युवराज पाटील यांनी भगीरथ भालके यांच्यावर केला.

Post a Comment

0 Comments