शिक्षणक्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी बदल स्विकारणे अत्यावश्यक

 

                                                                                         -शिक्षणतज्ञ प्रा. बी. एन. जगताप

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 'नॅशनल एज्युकेशन पॉलीसी २०२०' या विषयावरील कार्यशाळा संपन्न


पंढरपूर-‘विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ समृद्ध व सुरक्षित करण्यासाठी शैक्षणिक धोरणात आवश्यक असणारा बदल हा स्विकारलाच पाहिजे. कोणतेही क्षेत्र असो, त्यामध्ये सातत्याने बदल हे होत असतात. असे असताना शिक्षणात गुणात्मक बदल झाले पाहिजेत. असे बदल झाले तरच शिक्षण क्षेत्रात विकासासाठी चालना मिळेल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांचे भविष्य सुखकर होईल अर्थात यासाठी सर्व घटकांचे सहकार्य हवे असते. शिक्षण क्षेत्र व्यवस्थित चालले पाहिजे तरच भविष्यात समाजात गुणात्मक बदल जाणवतील. यासाठी हे शैक्षणिक धोरण व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित बाबी संपूर्णपणे जाणल्या पाहिजेत. समाजातील विविध क्षेत्रांचा परस्परसंबंध समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी असणारे नियम व कायदे यांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे केली पाहिजे. तत्वे व मुल्ये जपली पाहिजेत, त्यामुळे विद्यार्थी हे शिक्षणात आत्मविश्वासाने पुढे जातील आणि तेच शिक्षण महत्त्वाचे आहे.’ असे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्राचे जेष्ठ शास्त्रज्ञ व रसायनशास्त्र विभागाचे माजी संचालक प्रा.बी. एन.जगताप यांनी केले. 

      स्वेरी इंजिनिआरिंगमध्ये ‘अंडरस्टँडिंग अँड इफेक्टीवली अप्लायींग नॅशनल एज्युकेशन पॉलीसी २०२० फॉर अटेंनिंग एक्सलन्स इन हायर एज्युकेशन (उच्च शिक्षणात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० समजून घेणे आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे)’ या विषयावर आयोजिलेल्या चर्चासत्रात की नोट स्पीकर म्हणून शिक्षणतज्ञ प्रा.बी. एन.जगताप हे मार्गदर्शन करत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या व्यवस्थापन परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील ह्या होत्या. दीपप्रज्वलनानंतर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ. ए. एस. भुईटे म्हणाले कि, ‘अडचणीवर मात करुन यशस्वी होता येते पण अंगी जिद्द आणि आत्मविश्वास हवा कारण बदलांना सामोरे जाण्यासाठी हे गुण आवश्यक आहेत. सर्वांची इच्छाशक्ती असेल तर नवीन शैक्षणिक धोरण यशस्वी होऊ शकते. एकूणच बदलत्या काळाला सामोरे जाताना प्रबल इच्छाशक्तीसह होणारा बदल स्वीकारला पाहिजे व विकसित केलेल्या शिक्षणाचा पायंडा पुढे नेला पाहिजे.’ या कार्य शाळेचे प्रमुख अतिथी शिक्षणतज्ञ आनंद मापुसकर म्हणाले की, ‘समस्या, क्वालिटी, इंटरनॅशनल रेप्युटेशन व स्थानिक प्रश्न याबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रशासनात ‘माणुस’ हा महत्वाचा घटक असतो आणि शिक्षणात त्या घटकाचा जर विचार होत नसेल तर पुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. याच कारणामुळे महाराष्ट्रात अनेक शासकीय शाळा बंद पडत आहेत. यासाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ हे महत्वाचे आहे. ‘स्पर्धा परीक्षांमध्ये वयोमर्यादा वाढवा’ असे सांगतात. पण सध्या सामाजिक, राज्यसेवा, लोकसेवा यातील सरकारी नोकऱ्या उपलब्धीकडे जर पाहिले तर आपण अनेक चांगले विचारवंत गमावत आहोत, हे दुर्दैव आहे. चांगले उद्योजक तयार झाले तर विकासाला गती येईल. सार्वजनिक संस्था काही वर्षे व्यवस्थित चालुन सातत्य नसल्यामुळे बंद पडतात. यासाठी व्यवस्था बदलणे आवश्यक आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये शिक्षणात बदल आवश्यक आहेत.’ अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील म्हणाल्या की, ‘संस्थाचालक म्हणून संस्था चालवताना अनेक प्रश्न येत असतात. पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी,अकरावी व बारावी आणि त्यापुढे नवीन शिक्षण धोरण यांचा विचार करता अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातून जुन्या शिक्षण पद्धतीने काम करायचे झाले तर अनेक बंधने देखील येतात. अशा वेळी या कार्यशाळेची फार गरज आहे, ज्यातून चर्चेद्वारे शैक्षणिक कार्यक्रमाची आखणी व नियोजन एकत्रित करता येते. आजच्या या कार्यशाळेचे नियोजन उत्तम पद्धतीने केले असून असे सेमिनार वारंवार व्हावेत. बदल स्वीकारताना सुरुवातीला त्रास होतो पण नंतर मात्र सवय बनते आणि गोष्टी सहज होतात. शैक्षणिक संकल्पना जिवंत ठेवण्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. शिक्षणात नवीन बदल कठीण जात असले तरी स्वीकारावे लागणार आहेत. शिक्षक भरती नियमानुसार व्हावी, यूजीसी प्रमाणे अनुदान मिळावे या व इतर मागण्या आहेत. मागील त्रुटी सांभाळताना नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाणे हे एक आव्हान आहे.’ असे सांगून बहुमोल मार्गदर्शन केले. पुढे बोलताना प्रा.बी. एन.जगताप म्हणाले की, ‘आपल्या देशातील मुले ही शिक्षणासाठी परदेशात जातात ही बाब आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी धक्कादायक आहे. हे बदलण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. यासाठी ‘क्वालिटी एज्युकेशन’ वर भर दिला पाहिजे'. भविष्यकाळात शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवल्या जाणार्‍या अभ्यासक्रमात आणि संस्था स्वरुपात क्रांतिकारक बदल हे स्विकारावे लागतील. अन्यथा अशा संस्थांचे स्पर्धेत टिकणे दुरापास्त होईल. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील प्राध्यापकांनी या कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी माढा तालुक्याचे माजी आमदार विनायकराव पाटील, चंद्रकांत देशमुख, दशरथ गोप, श्री शेटे, सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे अजिंक्यराणा पाटील, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नूतन उपाध्यक्षा सौ. प्रेमलता रोंगे, तसेच दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.बी.पवार, प्राचार्य, बचुटे, बापुसाहेब शितोळे, सुरवसे, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी.नाडगौडा, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, सोलापूर जिल्ह्यातील आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, फार्मसी, डी.एड, बी.एड या महाविद्यालयांचे संस्थापक, अध्यक्ष, प्राचार्य व प्राध्यापक असे मिळून जवळपास ५०० जण उपस्थित होते. यावेळी सोबसचे संचालक गिरीश संपत यांनी स्वेरीज 'सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स' ची सविस्तर माहिती व या सेंटरच्या कार्यपद्धती विषयी माहिती दिली. कार्यक्रमानंतर अनेकांनी नवीन शिक्षण धोरणाबाबत प्रश्न विचारले असता शिक्षण तज्ञांनी त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर शिक्षणतज्ञ पाहुणे, प्राचार्य व प्राध्यापक वर्ग यांच्यात पॅनल डिस्कशन झाले. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments