Batmi 24 Taas Online : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना कडेकोट सुरक्षा पुरविण्यात आली होती आणि भाजपचे काही आमदारही त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी विधिमंडळात उपस्थित होते.
शिंदे गटातील आमदारांना हॉटेलमधून सकाळी साडेदहाच्या सुमारास बसगाडय़ांमधून विधान भवनात आणण्यात आले. मंत्रालयापासून विधान भवनापर्यंतच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. सुरक्षा कठडे बांधण्यात आले होते आणि या परिसरात कामाशिवाय कोणीही फिरकू नये, अशा सूचना करण्यात येत होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत विधान भवनात प्रवेशद्वारातून त्यांच्या गटातील सर्व आमदार आत आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून हे आमदार काही वेळ मुख्यमंत्र्यांच्या दालनात थांबून नंतर सभागृहात गेले.
भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी भगवे फेटे परिधान केले होते. विधानसभेत प्रवेश करताना शिंदे गटातील आमदारांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य आमदार भेटले आणि तेथे हास्यविनोद व टिप्पण्या सुरू झाल्या. त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचे आमदार आले.
0 Comments