अकोले, 16 जुलै : राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भंडारदरा धरण परिसरात फिरायला आलेल्या पर्यटकांची हुंदई क्रेटा गाडी ओढ्यात कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
धक्कादायक म्हणजे, दोघांना वाचवण्यासाठी गेलेला तरुणही वाहून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हार- घोटी रस्त्यावर वारंघुशी फाट्याजवळ ही घटना घडली. रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ओढ्यात पर्यटकांची गाडी वाहून गेली. यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान घडली असून दोघे मृत औरंगाबाद येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. औरंगाबाद येथील वकिली पेशा असलेले दोन तरुण भंडारदरा परिसरात फिरण्यासाठी आले होते. कळसुबाई शिखराकडून माघारी परतत असताना वळणाचा अंदाज न आल्याने हुंदाई क्रेटा गाडी थेट कृष्णवंती नदीपात्रात बुडाली. गाडीतील एकजण कसाबसा बाहेर पडला मात्र दोघांना बाहेर न पडता आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या गाडीच्या मागे असलेल्या एका तरुणाने दोघांना वाचवण्यासाठी धाव घेतली. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तोही पाण्यात वाहून गेला. (अवघ्या काही सेकंदात हनुमानाचे पुरातन मंदिर कोसळले, नागपूरचा LIVE ) दरम्यान, अकोले तालुक्यात पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे. पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने पर्यटकांची वर्दळ या भागात सुरू झाली असून पर्यटन करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
सोर्स : News 18 लोकमत
0 Comments