आदित्य ठाकरे ' पवार ' स्टाईलने मैदानात , पावसात भिजून कार्यकर्त्यांशी संवाद ,

 


मुंबई, 20 जुलै : आमदारांपाठोपाठ खासदारही एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेल्यामुळे शिवसेना (Shivsena) अडचणीत आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्तेही आता जायला लागले आहेत, त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मैदानात उतरले आहेत.

मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू आहे. आज वडाळ्यामध्ये त्यांची निष्ठा यात्रा सुरू होती, तेव्हा अचानक पाऊस आला. भर पावसामध्येही आदित्य ठाकरेंनी पावसात भिजून कार्यकर्त्यांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी छत्री घ्यायला नकार दिला. आदित्य ठाकरेंचं भाषण ऐकायला पावसातही गर्दी होती.


आदित्य ठाकरेंच्या या भाषणामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या (Sharad Pawar) साताऱ्याच्या पावसातल्या भाषणाची आठवण झाली. 2019 विधानसभा आणि साताऱ्याच्या पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी पावसात भिजून सभा घेतली. या सभेमुळे निवडणुकीचं चित्र बदलल्याचं बोललं जातं. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणावर गळती लागली होती.

राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करत होते. उदयनराजे भोसले यांनीही लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिंकल्यानंतर काही महिन्यांमध्येच भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे साताऱ्याची पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला. एकनाथ शिंदे यांनी 40 शिवसेना आमदारांसोबत केलेल्या बंडामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

आमदारांनंतर खासदारांनीही शिवसेनेला धक्का दिला. 19 पैकी 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. या पत्रात राहुल शेवाळे यांची गटनेते तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्य केली.

Post a Comment

0 Comments