Pandharpur Live Online:प्रेमामध्ये असणाऱ्या व्यक्तीला सर्वकाही क्षम्य असतं, असं नेहमी म्हटलं जातं. प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कशाचीही भीती वाटत नाही. प्रेमाखातर एखादी व्यक्ती संपूर्ण जगाशी लढण्यासाठी तयार होते.
असाच काहीसा प्रकार बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील हरनौत पोलीस ठाण्यातंर्गत घडला. एक प्रियकर चक्क त्याच्या प्रेयसीच्या लग्नात गेला अन् नवरदेवाने फुलांचा हार घालण्याआधीच त्याने स्वत:कडील हार प्रेयसीच्या गळ्यात घातला आणि तिच्या भांगेमध्ये कुंकू भरलं. संतप्त नातेवाईकांनी मात्र त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी कसेबसे प्रियकराचे प्राण वाचवले.
'टीव्ही नाइन हिंदी'ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. नालंदा जिल्ह्यातील हरनौत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मुबारकपूर गाव आहे. येथील शैलेंद्र राऊत यांचा मुलगा मुकेश हा मागील एका वर्षापासून गावातीलच एका तरुणीवर प्रेम करत होता. तरुणीही त्याच्यावर प्रेम करायची.
हा प्रकार तरुणीच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी मुलीचे लग्न इतरत्र जमवले. मंगळवारी, 5 जुलै 22 ही लग्नसमारंभाची तारीख ठरली. सर्व तयारी झाली होती. तरुणीच्या घरावर रोषणाई केली होती.
घराच्या गेटवर फुलांच्या माळा, बँडबाजा अशी सगळी तयारी झाली. वाजत-गाजत नवरदेवाची वरात दारात आली. सर्व वऱ्हाडी मंडळींचं स्वागत झालं. नवरदेव व नवरीला विवाहासाठी स्टेजवर आणण्यात आलं.
दोघांच्या हातात फुलांचे हार होते. दोघे एकमेकांना ते हार घालणार इतक्यात तरुणीचा प्रियकर तिथे आला. त्याच्याही हातात फुलांचा हार व कुंकूवाची डबी होती. नवरदेवाने हार घालण्याआधीच प्रियकराने त्याच्याकडील हार घालून तिच्या भांगेत कुंकू भरलं.
अचानक घडलेल्या या प्रसंगाने सगळेच चकित झाले. परंतु, हा प्रकार लक्षात आल्यानंतर वऱ्हाडी मंडळीतील काही जणांनी प्रियकराला पकडले व मारहाण करण्यास सुरूवात केली. वधूच्या नातेवाईकांनी लाथा-बुक्क्यांनी त्याची यथेच्छ धुलाई केली. हा प्रकार पोलिसांना कळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी गर्दीतून तरुणाला बाजूला करत त्याचा जीव वाचवला व उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल केलं.
तरुणी व तिच्या प्रियकरानेच ठरवला प्लॅन वधूच्या प्रियकराने लग्नात गोंधळ केल्यानंतर नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला. वराकडील मंडळींनीही संताप व्यक्त केला. दुसरीकडे प्रियकराने तरुणीसोबतच्या नातेसंबंधांबाबत उलगडा केला. एक वर्षांपासून दोघे एकमेकांवर प्रेम करत होते.
दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. परंतु तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं. स्वत: तरुणीनीच तिच्या प्रियकराला फोन करून बोलवलं होतं. नवरदेवाने हार घालण्याआधी तूच हार घाल व भांगेत कुंकू भर असं तिनेच प्रियकराला सांगितल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.
तरुण वेडा असल्याचा तरुणीच्या कुटुंबीयांचा दावा लग्नात हा गोंधळ झाल्यानंतर वधूकडील मंडळींनी प्रियकराला बेदम चोप दिला. तो तरुण खोटं बोलत असून, आपल्या मुलीशी त्याचं काहीही नातं नाही, असं तरुणीच्या कुटुंबीयांनी म्हटलं. तो तरुण वेडा असून विनाकारण मुलीची बदनामी केली जात असल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणात दोन्ही गटांकडून तक्रार अर्ज प्राप्त झाले असून तपास सुरू असल्याचे हरनौत पोलिस ठाण्याचे प्रमुख देवानंद शर्मा यांनी सांगितलं आहे.
0 Comments