Batmi 24 Taas Online : मुंबई : शिवसेनेत मोठे बंड घडवून आणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेनेवरील ताब्यावरून आगामी काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने जिल्ह्याजिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षनिष्ठेची प्रतिज्ञापत्रे भरून घेण्याचे धोरण आखले आहे. विधानसभेत विश्वासमत सिद्ध केल्यानंतर शिंदे गटाकडूनही शिवसेनेवरील वर्चस्वासाठी तयारी सुरू केली जाणार आहे.
शिवसेना पक्ष, शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि मुंबईतील शिवसेना भवनवरील ताब्यावरून शिंदे गट आगामी काळात हालचाली करू शकतो याचा अंदाज आल्याने शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू आहे.
या अनुषंगाने पुढे न्यायालयात प्रकरण गेले तर जिल्ह्याजिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर असल्याचे सिद्ध करण्यासाठी या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना कुणाची हा प्रश्न उभा ठाकला आहे.
मनसेने केला सवाल
'मी आयुष्यभर शिवसेनेतच राहीन. माझा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे' असे प्रतिज्ञापत्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भरून घेतले जात आहे आणि त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याला भुर्दंड सहन करावा लागत आहे, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शनिवारी केला. शिवबंधन बांधलेल्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास नाही का, 'आम्ही हिंदुत्व सोडणार नाही' असे प्रतिज्ञापत्र शिवसेनेच्या नेतृत्वानेही द्यायला हवे.
प्रवीण दरेकर यांची टीका
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना प्रतिज्ञापत्रच भरून घेणार असेल तर ते संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांकडून भरून घ्यावे, कारण राऊत हे राष्ट्रवादीच्या ओंजळीने पाणी पितात, अशी टीका केली. आपल्याच पदाधिकाऱ्यांवर शिवसेना नेतृत्वाचा विश्वास नाही का, असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचे प्रवक्ते खा. अरविंद सावंत यांनी, अशी प्रतिज्ञापत्रे भरून घेतली जात असल्याचा इन्कार केला. आमच्या पक्षात आम्ही काय करतो याचा भाजप अन् मनसेशी काय संबंध, असा सवालही त्यांनी केला.
(स्त्रोत : दै. लोकमत)
0 Comments