शिवसेनेचा दसरा मेळावा संकटात ? 2 वेळा पत्र पाठवूनही BMC कडून निर्णय होल्डवर !




 मुंबई, 29 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे आता शिवतीर्थ अर्थात दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा (shivsena dasara melava) कोण घेणार अशी चर्चा रंगली आहे.

शिवसेनेला अद्याप शिवतीर्थावर परवानगी मिळालेली नाही. मुंबई पालिकेनंच शिवसेनेला परवानगी देण्याचा निर्णय राखून ठेवला असल्याचे समोर आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. मात्र, शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे दसरा मेळावा कोण घेणार याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

तर दुसरीकडे आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय मुंबई महापालिकेकडून प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेनं दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क येथील परवानगीकरता दोनदा पत्र देऊनही पालिकेनं अर्ज अनिर्णित ठेवला आहे. गणेशोत्सव आटोपल्यानंतरच दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय घेऊ असं महापालिका सहाय्यक आयुक्तांचे स्पष्टीकरण दिले आहे. तसंच, सध्या सर्व स्टाफ गणेशोत्सवाकरता आवश्यक प्रशासनिक बाबी आणि तयारीत गुंतल्यामुळे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, यंदा शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सकारात्मक संकेत दिले आहे. हिंदुत्ववादी विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसैनिक जमत आले आहे. आता आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहोत.



जे हिंदुत्वावादी विचारांवर अधिकार सांगत आहे, त्यांनी विचार सोडले आहे. त्यामुळे त्यांना मेळावा घेण्याचा कोणता अधिकार आहे? हा मेळावा घेण्याचा आमचा अधिकार आहे. त्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा आहे या संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असं म्हस्के यांनी ठणकावून सांगितलं आहे.

त्यामुळे आता मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानात यंदाचा दसरा मेळावा ठाकरे गट आयोजित करणार की शिंदे गट आयोजित करणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. दसरा मेळावा घेण्याची अधिकृत परवानगी कुणाला मिळणार? याचा वाद आता पुन्हा वाढत जाणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरणरही तापणार आहे.

Post a Comment

0 Comments