मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत.
विनायक मेटे यांच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी त्यांचा मृत्यू अपघात की घातपात असा संशयवजा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं या सर्व प्रकरणाची राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय.
दरम्यान, मेटे यांच्या निधनामुळं त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून संधी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. शिवसंग्राम संघटना भाजपसोबत युतीत आहे. त्यामुळं त्यांच्या पत्नीला आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.
विनायक मेटे यांच्या कारला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर नुकताच भीषण अपघात झाला. यामध्ये मेटे यांचं निधन झालं. तीन दिवसांपूर्वी रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. पतीच्या अपघाती निधनावर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला असून मेटेंच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षासाठी मोठा लढा उभा केला होता.
0 Comments