सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणामुळे वाढलेले उसाचे क्षेत्र बिबट्यांना आश्रयासाठी अनुकुल ठरत आहे. त्यातच जंगलांचे क्षेत्र घटल्याने आता बिबट्या ऊस परिसरात येत आहेत, असे प्राणीतज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात करमाळा तालुक्यापासून ते अक्कलकोट तालुक्यापर्यंत आता बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. त्यांचा वावर नागरी वस्त्यांमध्ये भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
पूर्वी जिल्ह्यात जंगल भागात बिट्यांचा वावर होता. परंतु जंगलांचा र्हास होत असल्याने त्यांचा मूळ अधिवास धोक्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा, माढा, पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये नदीकाठच्या भागात ऊसाचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर या परिसरात वाढला आहे.
मात्र, मागील अनेक दिवसापासून मोहोळ, माढा, अक्कलकोट या तालुक्यांमध्येही बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. ऊस पट्यात राहणारे शेतकरी शेतीपूरक उद्योग म्हणून शेळा, कोंबड्या, इतर पाळीव जनावरे पाळतात. आणि बिबट्या त्याच्यावर हल्ला करत आहेत. तसेच शेतामध्ये राहणार्या शेतकर्यांवरही बिबटे हल्ला करत आहेत. वनविभागाने याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करावी अशी मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.
वनविभागाच्या हेल्पलाइवर साधा संपर्क
जिल्ह्याच्या कोणत्याही भागामध्ये बिबट्या आढळून आला तर नागरिकांनी वन विभागाच्या 1739 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करावा. त्यानंतर संबंधित ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी येतील, असे वनविभागाकडून सांगण्यात आले आले आहे.
उजनी बॅकवॉटर परिसरात पूर्वीपासूनच बिबट्याचा वावर आहे. पण अलीकडे जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जिल्ह्यात केवळ दोन टक्के वनक्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्याला राहण्यासाठी, प्रजननासाठी जागा नाहीत. त्यामुळे उसाच्या क्षेत्रांमध्ये बिबट्या आढळून येत आहेत.
– वनविभाग, सोलापूर
0 Comments