निसर्गाचा होत असलेला ऱ्हास...पर्यावरणाचा ढासळणारा समतोल ...बिघडत चाललेले निसर्ग चक्र इ. विषयीचा कळवळा व जाणीव प्रकर्षाने होत असल्याने कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यानी अतिशय सुबक आणि देखण्या गणेश मूर्ती साकारून पंढरपूरवासियांना पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे जणू आवाहनच दिले !
सोमवार, दि.२९ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्टान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत गणेशोत्सवाचे औचित्य साधून कर्मयोगी विद्यनिकेतन प्रशालेच्या प्राचार्या सौ.प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शाडूपासून श्री गणेश मूर्ती बनवण्याच्या प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गणेश मूर्ती तयार केल्या.
पर्यावरण पूरक उत्सवांना प्रोत्साहन मिळावे आणि बालविश्वाच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केल्याचे प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी सांगितले. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार असल्याने मुलांमध्ये गणेश मूर्ती बनवताना उत्साहाचे वातावरण होते. आपल्या कलेचा कल्पकतेने वापर करत अतिशय सुंदर आणि सुबक मुर्ती या मुलांनी साकारल्या. कोरोना काळाच्या दुर्दैवी कालखंडानंतर बाळ गोपाळांची कल्पनाशक्ती, बालविश्वाची कवाडे उघडताना, खुलताना बघून मनस्वी आनंद वाटला, असे सोलापूर जिल्ह्याचे आमदार व संस्थेचे विश्वस्त मा.श्री.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेनिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शाडू मातीला आकार देत चिमुकल्या हातांनी विविध रूपातील गणपती बाप्पाच्या मूर्ती साकारल्या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हस्त कौशल्याच्या उत्तम स्वरुपासह त्यांच्या कलाविष्काराचे नानाविध नमुने पहावयास मिळाले, असे पांडुरंग प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त मा.श्री.रोहन परिचारक म्हणाले. यावेळी संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके ही उपस्थित होते. या कार्यशाळेदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मातीच्या मूर्ती बनवणे, रंगकाम करणे, सजावट करणे या विषयाशी संबंधित मार्गदर्शन त्यांचे शिक्षक नारायण कुलकर्णी, वृषाली काळे आणि विद्या जाधव यांनी केले. विद्यार्थ्यांनी मातीला आकार देत विविध प्रकारच्या सहज सुंदर मूर्ती घडवल्या या कार्यशाळेनिमित्त विद्यार्थ्यांचा विकास, उत्पादन कार्यातील सुबकता ,आकर्षकता, निर्मिती प्रदर्शन इ.बाबतची कौशल्ये विकसित करणे हा उद्देश या कार्यशाळे मागे होता. मुलांना अभ्यासासोबत इतर क्षेत्रांची ओळख व्हावी त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव मिळावा असे वातावरण निर्माण करून नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविणारी, कर्मयोगी विद्यानिकेतन ही पंढरपुरातील एकमेव शाळा म्हणावी लागेल!
0 Comments