वांद्रे - कुर्ला संकुलातील मैदान शिंदे गटाला ; दसरा मेळाव्यासाठी बंडखोरांचा अर्ज स्वीकारला शिवसेनेचा फेटाळला



Online team 24 taas : मुंबई : दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळविण्याकरिता शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटामध्ये रस्सीखेच सुरू असून मुंबई महापालिकेने कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

असे असताना वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावे याकरिता बंडखोर आमदारांच्या गटाने केलेला अर्ज 'एमएमआरडीए'ने स्वीकारला असून शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आहे.

बंडखोर गटाच्या आमदारांच्या अर्ज एमएमआरडीएने स्वीकारल्याने त्यांना मैदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेने बीकेसीतील ज्या मैदानासाठी अर्ज केला होता, ते आधीच आरक्षित आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दोन्ही गटांना नाकारण्यात आल्यास शिंदे गटाला 'बीकेसी'चा पर्याय उपलब्ध असेल, हे स्पष्ट झाले आहे.

गेली अनेक वर्षे नियमितपणे शिवसेनेतर्फे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यात येत आहे. मात्र शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीचा फटका यंदा दसरा मेळाव्यालाही बसण्याची चिन्हे आहेत. शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेनेबरोबरच बंडखोर आमदारांच्या गटानेही अर्ज केला आहे, परंतु शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन महापालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर घेण्याचा पर्याय शिंदे गटापुढे असणार आहे, तर शिवसेनेची मात्र कोंडी होण्याची शक्यता आहे.

घडले काय?

'एमएमआरडीए'तील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदाने कार्यक्रमांसाठी भाडय़ाने देण्यात येतात. यापैकी एका मैदानासाठी शिंदे गटाने, तर दुसऱ्या मैदानासाठी शिवसेनेने अर्ज केला होता. शिंदे गटाने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता ते आरक्षित नव्हते, त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला, तर शिवसेनेने अर्ज केलेले मैदान एका खासगी कंपनीने आरक्षित केले आहे, त्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला.

(सोर्स : लोकसत्ता)

Post a Comment

0 Comments