बागलकोटमध्ये जात वेगळी असल्याने एका प्रेमी युगुलाची त्यांच्याच कुटुंबाने हत्या करून दोघांचे मृतदेह नदीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
परसप्पा कराडी याने 10 ऑक्टोबर रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार बागलकोट येथील पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. शिवाय, त्याने आपली मुलगी घरातून पळून गेल्याचा संशय व्यक्त केला होता. तिला फूस लावून तिचे अपहरण झाले असावे, असा अंदाज कराडी याने वर्तवला होता. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्यांनी कराडी याचे फोन रेकॉर्ड्स तपासले. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर विश्वनाथ नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. शिवाय, कॉल रेकॉर्ड्स तपासल्यामुळे संशय बळावला. पोलिसांनी कराडीला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला.
कराडीची मुलगी राजेश्वरी (वय १७) हिचे विश्वनाथ नेलागी (वय २५) याच्याशी चार ते पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कराडी हा उच्च जातीचा असून विश्वनाथ याची जात तथाकथित कनिष्ठ जात आहे. काही काळापूर्वी राजेश्वरी विश्वनाथसोबत पळून गेली होती. तिला कराडी कुटुंबाने परत बोलवून आणले. पण राजेश्वरीला विश्वनाथशीच लग्न करायचे होते. अखेर कराडी कुटुंबाने लग्नाची बोलणी करण्याच्या बहाण्याने विश्वनाथला भेटायला बोलवले. 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्यात फोनवर तशी चर्चा झाली. विश्वनाथला नारागुंड येथे त्यांनी भेटायला बोलवले.
विश्वनाथला गाडीत बसायला सांगून त्याला मारहाण केली. या मारहाणीत विश्वनाथचा मृत्यू झाला. दरम्यान दुसऱ्या गाडीत राजेश्वरीची गळा आवळून हत्या केली. कुटुंबाने त्या दोघांचे कपडे उतरवले आणि त्यांचे मृतदेह हनगुंड येथील कृष्णा नदीत फेकून दिले. नदीत असलेल्या मोठ्या माश्यांना आणि मगरींना ते खाता यावेत यासाठी कराडी कुटुंबाने असे केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी 18 ऑक्टोबर रोजी राजेश्वरीचे वडील आणि अन्य तीन नातेवाईकांना अटक केली आहे. अन्य तीन जण फरार झाले असून, पुढील तपास सुरू आहे.
0 Comments