धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होती. त्यामुळे अधिक लुट मिळेल, या हेतूने तीन दरोडेखोर एका ज्वेलर्सच्या दुकानात शिरले.
दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी उत्साहाने साजरी होत होती. सराफी दुकानातून उत्साहाने खरेदी होत होती. दत्तनगर चौकातून जांभुळवाडीकडे जाणार्या मार्गावर ऑलिव्ह सोसायटीमध्ये श्री मल्हार ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान आहे. दुकानात रात्री साडेदहा वाजता चालक आकाश कडोले (वय २८, रा. रविवार पेठ) हे आवराआवर करीत होते. दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना हातात रिव्हॉल्व्हर आणि कोयता घेऊन दोघे जण दुकानात शिरले. एक जण बाहेर थांबला होता. सशस्त्र चोरट्यांना पाहून आकाश कडोले यांनी प्रसंगावधान राखून अलार्मचे बटण दाबले. त्याबरोबर अलार्म वाजू लागला. हा आवाज ऐकून चोरटे गोंधळले. त्यांना आपण पकडले जाऊ असे वाटल्याने त्यांनी पळून जाताना एक गोळी झाडली. ती दुकानाच्या काचेला लागून काच फुटली. तिघे जण दुचाकीवरुन पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी घटनेची पाहणी केली असून सीसीटीव्हीवरुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.
0 Comments