फॉरेन फंडमधून आठ कोटी रुपये कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने प्रोसेसिंग फीच्या नावाखाली एका व्यावसायिकाला 12 लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे
याप्रकरणी हिरामण हनुमंत धनकवडे (वय 45, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर बिदरमल भंडारी (वय 65), योगेश किशोर भंडारी (वय 39), संदीप बाळू घोरपडे (वय 35), सुजाता संदीप घोरपडे (वय 30), प्रसाद चंद्रकांत घोरपडे (वय 30) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 जानेवारी 2019 ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांनी एका बँकेकडून 1 कोटी 60 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. तंडजोडीअंती बँकेने त्यांना 1 कोटी 30 लाख रुपये भरण्यास सांगितले होते.
मात्र, एवढी मोठी रक्कम नसल्याने त्यांना पैशाची गरज होती. एका मित्राच्या माध्यमातून त्यांचा आरोपींसोबत परिचय झाला होता. किशोर भंडारी याने त्यांना फॉरेन फंडमधून 8 कोटी रुपये कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली 9 लाख रुपये योगेश भंडारी याच्यामार्फत आरटीजीएसद्वारे स्वीकारले. त्यानंतर किशोरने संदीप व सुजाता यांचा फिर्यादीसोबत परिचय करून दिला होता. त्यांनी आठ कोटींसाठी दीड टक्के प्रोसेसिंग फी भरण्यास सांगून सुजाता यांच्या बँक खात्यात 3 लाख 20 हजार रुपये घेतले.
दरम्यान, आरोपीने कर्ज मंजूर न करता तसेच त्यांच्या फर्ममध्ये गुंतवणूक न केल्याने फिर्यादीने दिलेले पैसे किशोर व योगेश यांच्याकडे परत मागितले. त्या वेळी दोघांनी फिर्यादींना, 'मी नमो सेनेचा अध्यक्ष व अखिल मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष आहे. माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही. कोणी काही प्रयत्न केला तर गोळ्या घालून मारून टाकीन.
माझे राजकीय पुढार्यांत उठणे-बसणे आहे.' तर संदीप घोरपडे याने फिर्यादींच्या मोबाईलवर हातात पिस्तूल घेतलेले गुंडाचे फोटो व इतर काही राजकीय पुढार्यांचे फोटो पाठवून फोनद्वारे 'पैसे परत देणार नाही,' अशी धमकी दिली. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर चौकशीअंती हा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पासलकर करीत आहेत.
0 Comments