औरंगाबाद : दीड हजार रुपयांच्या उसनवारीतून एकाने तिघांवर चाकूहल्ला केल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी एसबीओए शाळेसमोरील पान टपरीजवळ घडली होती.
पोलिस उप निरीक्षक मारुती खिल्लारे यांनी सांगितले की, रिक्षाचालक विकास उत्तमराव अवसरमल (३१, रा. नवनाथनगर, हडको) २ आॅक्टोबरला रात्री ११ वाजता मनोज बनकरला उसने दिलेले दीड हजार रुपये मागण्यासाठी एसबीओए शाळेसमोरील कबीर पानटपरीजवळ गेला होता. अवसरमलने पैसे मागताच मनोज बनकरने पैसे देण्यास नकार दिला, तसेच तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली. त्यावर स्वप्नील जाधवने भांडण करायचे का?, असे म्हणत कमरेचा चाकू काढून अवसरमलवर हल्ला केला.
तेवढ्यात तेथे आलेले अवसरमलचे मित्र रवींद्र कुंभारे व प्रणील वंजारे हे मध्ये पडले. तोच स्वप्नीलने रवींद्र कुंभारे पाटीलच्या पोटात चाकू खुपसला. प्रणील वंजारे त्याला वाचविण्यासाठी गेला असता आकाश ऊर्फ सोन्या ठोंबरे याने कानशिलात चापट मारत रोखले. त्यावर स्वप्नील जाधवने प्रणीलच्या पाठीत चाकू खुपसला. ते जखमी होऊन जमिनीवर कोसळले. नागरिक मदतीसाठी धावले. त्यानंतर स्वप्नील जाधव, मनोज बनकर, आकाश ऊर्फ सोन्या ठाेंबरे हे तेथून पळून गेले. काही वेळातच पोलिसांची व्हॅन आली. त्यांनी जखमींना घाटीत दाखल केले. तीन आरोपींपैकी स्वप्नील जाधव आणि आकाश ऊर्फ सोन्या ठोंबरे या दोघांना विशेष पथकाचे उपनिरीक्षक रफी शेख यांनी तात्काळ अटक केली. त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे तर मनोज बनकर अद्याप फरार आहे.
0 Comments