काळ आला होता , पण ... भीषण अपघातात बालंबाल बचावले तिघे शिक्षक


 नियंत्रित वेगात प्रवास करणार्‍या शिक्षकांच्या कारला भरधाव वेगातील कंटेनरने जबर ठोस दिली. त्यामुळे कार थेट पुढे धावणार्‍या कंटनेरखाली दबली गेली.

परंतु, दैव बलवत्तर म्हणून गंभीर दुखापतीवर निभावले. तिघे शिक्षक सुरक्षित बचावल्याचा भिषण अपघात मुंबई – आग्रा महामार्गावर लब्बैक हॉटेलसमोर गुरुवारी (दि.13) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडला. अपघातात चक्काचूर झालेल्या कारची स्थिती पाहून प्रत्येकाच्याच काळजाचा ठोका चुकला. जखमी शिक्षकांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात एनडीएसटी निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या संस्थेशी निगडित शिक्षकांना 'काळ आला होता, पण..' या उक्तीची प्रचिती आली. जखमी शिक्षक सुनील नारायण निकम (53, रा. विजयनगर, कॅम्प) यांनी पवारवाडी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या फियादीनुसार, ते किरण बाबुलाल भामरे (45) व बाजीराव नामदेव कदम (56) यांच्यासमवेत कारने (एमएच 39 एबी 0308) मनमाड चौफुलीकडून चाळीसगाव चौफुलीच्या दिशेने जात होते. समोर कंटेनर असल्याने त्यामागे ते धिम्यागतीने झाले असता गतिरोधकावर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने (एनएल 01 एसी 2138) त्यांना जबर ठोस दिली. त्याने कार थेट पुढील कंटेनरच्या खाली घुसली. या अनपेक्षित प्रसंगातही तिघे सावध असल्याने त्यांनी स्वत:चे अंग चोरले. परिणामी, ते थोडक्यात बचावले. परंतु त्यांना गंभीर दुखापत झाली. निकम यांच्या छातीस, भामरे यांच्या उजव्या पायाला, छातीला आणि कदम यांच्या उजव्या पायाला व पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य केले. जखमींना बाहेर काढून तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Post a Comment

0 Comments