उसने पैसे देण्याघेण्यावरुन एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तिघांनी आपल्या मित्रावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
इंजमाम जुबेर इद्रीसी (वय २२, रा. दरबार बेकरीजवळ, येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी मोहसीन ऊर्फ मोबा बडेसाब शेख (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), मोईन कालु शेख आणि शहानबाज शेख या तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. शहानबाज शेख याला अटक केली आहे.
याप्रकरणी अन्सार जुबेर इंद्रीसी (वय १८, रा. येरवडा) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. ५००/२२) दिली आहे. हा प्रकार लोहगाव परिसरातील राजीव गांधी हॉस्पिटल जवळ २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच ते सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजमाम हा एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होता. त्याचे एका वर्षापूर्वी मोईन कालु शेख याच्याबरोबर उसने पैसे देण्याघेण्यावरुन भांडणे झाली होती. हा राग मनात धरुन त्याने इतर दोघांच्या मदतीने इंजमाम याला जेवायला नेले. त्यानंतर त्याने भांडण उकरुन काढून त्याला बेदम मारहाण करुन हत्याराने वार करुन त्याचा खून केला.
राजीव गांधी हॉस्पिटलजवळ मृतदेह पडला असल्याची माहिती सकाळी येरवडा पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केल्यानंतर या तिघांची नावे समोर आली.
पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे अधिक तपास करीत आहेत.
0 Comments