प्रेयसीचे अश्लील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन प्रेयसीला एक लाख रुपये खंडणीची मागणी केली. बदनामी होऊ नये म्हणून प्रेयसीने चक्क आईचे जवळपास एक लाख रुपयांचे दागिने प्रियकराच्या स्वाधीन केले.आईने दिवाळीनिमित्त सोन्याच्या दागिन्याचा डबा खाली काढला असता हा प्रकार उघडकीस आला.
दोघांची ‘ॲप’वरूनच मैत्री झाली आणि एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले. काही दिवस ‘व्हॉट्सॲप’वरून गप्पा केल्यानंतर त्याने रियाला फुटाळा तलावावर भेटायला बोलावले. ती मैत्रिणीसह भेटायला गेल्यानंतर त्याने एका महागड्य हॉटेलमध्ये तिला पार्टी दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून मोठा शासकीय अधिकारी बनणार असल्याचे त्याने तिला सांगितले. त्यानंतर दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. बेरोजगार असलेल्या कुणालने रियाला पुस्तके घेण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तिने लगेच वडिलांकडून पैसे घेऊन कुणालला दिले. त्यामुळे कुणालची हिंमत वाढली.
त्याने रियाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अंबाझरी तलावावर नेऊन तिचे अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर तो रियाला वारंवार पैशाची मागणी करू लागला. प्रियकर असल्यामुळे ती आईवडिलांकडून पैसे घेऊन प्रियकराला द्यायला लागली. कुणाल यादवने रियाला एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अश्लील छायाचित्र प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून तिने कपाटात ठेवलेले जवळपास एक लाख रुपयांचे आईचे दागिने कुणालला दिले. त्यानंतरही वारंवार तिला पैशासाठी त्रास देत होता. दर महिन्याला ती कुणालला पैसे नेऊन देत होती. तसेच तो तिला फिरायला नेऊन तिच्याशी गैरकृत्य करून अश्लील छायाचित्रही काढत होता.
0 Comments