घरदार सोडून गेलेल्या १८ वर्षीय मुलीच्या मदतीला पोलिसाच्या रूपाने साक्षात दुर्गाच



 मुंबई: दसऱ्याच्या दिवशी शुल्लक कारणावरून घर सोडून निघून गेलेल्या १८ वर्षीय मुलीला महिला पोलिसाने समजावून घरी सुखरुप पोहचवले.  सहयोग फाउंडेशनच्या कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्तांनी तिच्या या कार्याची दखल घेऊन तिचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

शिवानी यादव (१८) ह्या बीएस्सीच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या मुलीला तीचे वडील ती फोनवर सारखी बोलते म्हणून रागवले होते. त्यामुळे रागाच्या भरात तीने घरातून निघून जाण्याचे टोकाचे पाऊल उललले. लोकल मधून जात असताना माटुंगा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सारिका उबाळे या महिला पोलिसाला ही मुलगी रडत असलेली दिसली. त्यांनी तिची विचारपूस केली असता तिने सर्व काही खरे सांगितले. त्यानंतर सारिका यांनी तिला दादर स्थानकावर उतरवले. स्थानकासमोर असलेल्या बीट चौकीत नेऊन पोलीस निरीक्षक केशव वाघ यांना घडलेल्या सर्व गोष्टीची कल्पना दिली. त्यांनी तिची विचारपूस करून तिच्या पालकांबाबत माहिती मिळवली. त्यानंतर तिच्या पालकांना याबाबत कळविले आणि तिची सुखरूप घरवापसी केली.

बुधवारी सगळीकडे दसऱ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना शिवानी सायंकाळच्या सुमारास घरातून निघून गेली. अचानक मुलगी बेपत्ता झाल्याने तिचे पालक प्रचंड तणावाखाली होते. रात्रभर शोधाशोध करूनही ती सापडत नव्हती. मात्र महिला पोलीसाने तिची समजूत काढून तिला सुखरुप घरी आणून सोडल्याने तिचे सर्वत्र कौतुक होते आहे.

Post a Comment

0 Comments