चोरट्यांचा दिवाळी धमाका

 


तालुक्यातील चेंडूफळ व जरूळ या दोन ठिकाणी चोरट्यांनी एकाच रात्री घरफोडी करून रोख रकमेसह दागिने घेऊन पोबारा केला. दिवाळी सणाच्या तोंडावर दोन ठिकाणी घरफोड्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी वीरगाव तसेच वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चेंडूफळ येथे शनिवारी मध्यरात्री अनिल बाळासाहेब पवार यांच्या किचनचा दरवाजा तोडून घरात चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. तसेच कुटुंबातील सदस्यांना मारण्याची धमकी देऊन कपाटातील ४० हजाराची रोकड तसेच सोने चांदीचे दागिने असे १ लाख २० हजारांचा मुद्देमाल लुटून नेला.

तर दुसरी घटना जरुळ शिवारात घडली. शेत वस्तीवर राहणाऱ्या रियाना नजीर पठाण या नातेवाईक आजारी असल्याने त्यांच्याकडे कुटुंबासह गेल्या होत्या. सकाळी सहा वाजेचे दरम्यान घरी परतल्यावर त्यांना चोरट्यांनी घराला लावलेली कुलूप तोडल्याचे लक्षात आले. घरात कपाटात ठेवलेले रोख ५० हजार आणि सोन्याचे दागिने असे एक लाख २२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले.

दोन्ही ठिकाणी घटना स्थळी श्वानपथक व ठसे तज्ञांच्या पथकाने भेट दिली. चेंडूफळ येथे वीरगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद रोडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चेंडुफळ चोरी प्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक नवनाथ कदम हे करीत आहेत. तर जरुळ प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार पाटील हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments