ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या तरुण व्यापाऱ्यांचा मृतदेह अखेर सापडला

 


सिरसाळा - मोहा रस्त्यावरील एका ओढ्यात जीपसह तिघे तरुण बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली होती.

ग्रामस्थांना गाडीतील दोघांना वाचविण्यात यश आले होते तर एकजण बेपत्ता होता. आज दुपारी त्याचा मृतदेह घटनास्थळापासून जवळ एका बंधाऱ्यातील गाळात सापडला. रईस अन्सर अत्तार ( ३५ ) असे मृताचे नाव आहे.

गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. नद्या, नाले, ओढयांना पूर आला आहे. दरम्यान, आज दुपारी शेख रईस अन्सर अत्तार, शेख अखिल अत्तार व दिपक चोरघडे हे तिघे दिंद्रुडहून जीपमधून अंबाजोगाईकडे निघाले होते. सिरसाळा ते कान्नापूर- मोहा रस्त्यावरील गव्हाडा या ओढ्याला पुर आला आहे. चालकाला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने जीप ओढ्यात बुडाली. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने जीपसह तिघे तरुण ओढ्यात शंभर फुटांपर्यंत वाहून गेले. गाडी ओढ्यात बुडाल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ बचावकार्यासाठी धावले. शेख अखिल आत्तार व दीपक चोरघडे या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र शेख रईस अन्सर अत्तार हा तरुण बेपत्ता होता. शुक्रवारी पाऊस व पुरामुळे शोध कार्यात अडथळा येत होता.

दरम्यान, आज सकाळी साडे अकरा वाजता परळी येथील अग्निशमन दलाच्या पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरुणाचा शोध सुरु केला. काही वेळाने घटनास्थळापासून काही अंतरावरील बंधाऱ्यातील गाळात तरुणाचा मृतदेह आढळून आला. धारूरच्या तहसीलदार दत्ता भारस्कर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड घटनास्थळी तळ ठोकून होते.

Post a Comment

0 Comments