दरवाजा लावायला विसरले अन् चोरट्याने साधला डाव


धनत्रयोदशीच्या  पुजेसाठी त्यांनी देवघरात ७ लाख ९३ हजार रुपयांचे दागिने ठेवले होते. विधीवत पुजन केल्यानंतर ते कुटुंब झोपी गेले.

परंतु, बंगल्यातील स्वयंपाक घराच्या पाठीमागील दरवाजा चुकून उघडा राहिला आणि चोरट्याने डाव साधत दागिन्यांवर डल्ला मारला. 

याबाबत गौरांग होनराव  (वय ३०, रा. आदित्य बंगला, पुणे विद्यापीठ सोसायटी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. होनराव या आजी आजोबांची काळजी घेण्यासाठी कर्वेनगरला राहतात. दिवाळीनिमित्त त्यांचे मामा, मामी, दोन मुली शिकागो येथून दिवाळीसाठी पुण्यात आले आहेत. धनत्रयोदशीच्या पूजेसाठी बँकेच्या लॉकरमधून दागिने घरी आणले होते. शनिवारी (२२ ऑक्टोबर) होनराव यांनी देवघरात पूजेसाठी दागिने मांडले होते. विधीवत पूजन केल्यानंतर होनराव कुटुंबीय रात्री झोपले. स्वयंपाकघरातील मागील बाजूचा दरवाजा उघडा होता. दरवाजा बंद करण्यास होनराव विसरल्या. बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी देवघरातून ७ लाख ९३ हजार रुपयांचे दागिने लांबविले. 

सकाळी आजी उठल्यानंतर हा प्रकार समोर आला.
चोरट्यांनी होनराव यांच्या बंगल्यातून २२६ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच ५० ग्रॅम चांदीचे दागिने लांबविले.
पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांच्या शोध घेण्यात येत असून पोलिसांकडून  परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments