कापसाच्या शेतातून ५० किलो गांजा जप्त



बामखेडा (ता. शहादा) शिवारात कापसाच्या शेतात गांजाची शेती करणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली.

सारंगखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बामखेडा शिवारात एकाने कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती  पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक व सारंगखेड्याचे पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले असता, संशयित राकेश हिरालाल शिरसाठ (वय ३२, रा. बामखेडा) याने शेतातून पळ काढण्याच्या प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. कापसाच्या शेतातून पोलिस पथकाने ५० किलो ३१५ ग्रॅम वजनाचा तीन लाख ५२ हजार २०५ रुपयांची २५ गांजाची झाडे जप्त केली असून, संशयित राकेश शिरसाठ याच्याविरुद्ध सारंगखेडा पोलिस ठाण्यात गुंगीकाराक औषधे द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments