बिहारमध्ये हत्या करून मुंबईतील हॉटेलमध्ये लपून बसलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने अटक केली. सनतकुमार जयकुमार सिंग ऊर्फ शुभम सिंग आणि सोनूकुमार भारती ऊर्फ शुभम गिरी अशी त्या दोघांची नावे आहेत.
शुभम हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे तेथे क्लिनिक आहे. काही महिन्यांपूर्वी शुभमच्या चुलत बहिणीच्या नवऱ्याचा सुजित मेहताशी वाद झाला होता. वादानंतर सुजितची जामिनावर सुटका झाली होती. सुजितची पत्नी ही तेथील जिल्हा परिषद सदस्य असल्याने तिचे राजकीय वजन अधिक होते. त्याचा फायदा सुजित घेत होता. तो गावात सर्वांना धमकावत असायचा. सुजित आपलीदेखील हत्या करेन अशी भीती शुभम आणि सोनूकुमारला वाटत होती. तसेच या गुह्यात अटकेत असलेला आरोपी आकाशच्या एका नातेवाईकाचीदेखील सुजितने हत्या केली होती. त्याचा रागदेखील आकाशच्या डोक्यात होता. सुजितचा काटा काढण्यासाठी आकाशने शुभमला पिस्तूल आणि दोन लाख रुपये दिले. ऑगस्ट महिन्यात सुजित हा मोटरसायकलवरून जात होता तेव्हा शुभम, सोनूकुमार, आकाशने मिळून सुजितची गोळय़ा झाडून हत्या केली. हत्येनंतर त्याने एक व्हिडीओ व्हायरल केला. हत्येप्रकरणी अंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास करून आकाशसह सहा जणांना अटक केली, तर शुभम आणि सोनूकुमार हे दोघे फरार होते. हत्येच्या गुह्यातील दोन फरार आरोपी हे जुहू येथील एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाला मिळाली. प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक प्रशांत सावंत, देशमुख, उपनिरीक्षक कुरेशी, बंगाळे, साबळे, अविनाश गावडे, कांबळे आदी पथकाने तपास सुरू केला व त्या दोघांना अटक केली. कसून चौकशी केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली. शुभम हा सराईत गुहेगार असून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.
0 Comments