महाराष्ट्रात बंदी घातलेला गुटखा चाेरट्या मार्गाने रेणापूरकडून पानगावच्या दिशेने सुसाट निघालेल्या कंटनेरला पोलिसांनी पानगाव हद्दीत मोठ्या शिताफीने पकडले.
यावेळी कंटेनरची झाडाझडती घेतली असता, कंटेनर आणि गुटखा, असा एकूण ३९ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली. रेणापूर तालुक्यातील ही आतापर्यंतची सर्वांत माेठी कारवाई आहे. याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, एका कंटेनरमधून (एमएच १४ जीडी ४१५०) रेणापूर ते पानगाव मार्गावरून धर्मापुरीच्या दिशेने अवैध गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती रेणापूर पोलिसांना खबऱ्याने दिली, या माहितीच्या आधारे रेणापूर पोलिसांनी पानगावपासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे फाटकाजवळ सापळा लावला. गुटखा घेऊन येणाऱ्या कंटेनरला थांबून चालकाची चौकशी केली. अधिक झाडाझडती घेतली असता, चालकाने कंटेनरमध्ये गुटखा असल्याचे सांगितले. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणला. अधिक तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची पांढऱ्या रंगाची पोती आढळून आली. त्यामध्ये गुटख्याची एकूण २१ मोठी पोती, ज्यात प्रतिपाेत्यात सहा बॅग असलेल्या एकूण १२६ बॅग, (किंमत १६ लाख ३८ हजार) आणि इतर गुटख्याची एकूण १० मोठी पोती ज्यात प्रत्येक पोत्यामध्ये ६ बॅग, अशा एकूण ६० बॅग, ज्यांची प्रत्येक बॅगची किंमत ८ हजार रुपयांप्रमाणे ४ लाख ८० हजार, असा एकूण २१ लाख १८ हजारांचा गुटखा आढळून आला. गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला कंटेनर (किंमत १८ लाख), असा एकूण ३९ लाख १८ हजारांचा मुद्देमाल रेणापूर पोलिसांनी जप्त केला. याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments