खडकवासला धरणात चौपाटीला लागून एका विवाहितेचा पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह आढळून आला आहे. सारिका संदीपान वाकुरे (वय 29, रा. एकता कॉलनी उत्तमनगर मुळ रा.
हिंगळजवाडी, उस्मानाबाद) असे मृत महिलेचे नाव असून कौटुंबिक कारणाने सदर महिलेने आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
खडकवासला धरणाच्या पाण्यावर महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती सकाळी चौपाटीवरील विक्रेत्यांनी हवेली पोलीसांना दिली. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक तारु व कॉन्स्टेबल महेश कांबळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डीआयएटीच्या पंपहाऊसजवळ सिमेंटच्या संरक्षक भिंतीवर संबंधित महिलेने पर्स ठेवली होती व पाण्याजवळ चप्पल सोडलेली होती. पर्समध्ये पासपोर्ट साईज फोटो व एका व्यक्तीचा मोबाईल नंबर लिहिलेला आहे.
संबंधित मोबाईल नंबर वर संपर्क केला असता धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. सदर महिलेचे पहिले लग्न झालेले असून एक वर्षभरापूर्वी ती घरुन पळून पुण्यात आली होती. वर्षभरापासून ती उत्तमनगर येथील मुस्लीम व्यक्तीबरोबर राहत होती. संबंधित मुस्लिम व्यक्ती व त्या विवाहितेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात जाऊन काही महिन्यांपूर्वी लग्न करणार असल्याबाबत लेखी जबाब दिला होता. दरम्यान सध्या महिलेच्या पहिल्या लग्नाबाबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे जवान अक्षय काळे,योगेश मायनाळे, पंकज माळी व सोन्याबापू नागरे यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला असून हवेली पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
0 Comments