पत्नीच्या जाचाला कंटाळून नागपूर शहरातील सक्करदरा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अयोध्यानगर परिसरातील दुर्गा नगरातील एका पतीने मोहगाव (झिल्पी) तलावाजवळील भिवकुंड नाल्याजवळ पेट्रोलजन्य पदार्थ अंगावर टाकून जाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.५)रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
राहुल श्यामलाल बोरीकर असे मृतकाचे नाव आहे. राहुल बोरीकर(४५) हे अयोध्या नगर परिसर साई मंदिराजवळ, दुर्गानगर, नागपूर येथील रहिवासी होते. दहा महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते.
राहुल बुटीबोरी येथील निलकमल कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावाजवळील भिवकुंड नाला 'लव्हर्स पॉईंट '' म्हणून ओळखला जातो. दिवसभर महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची झुंबड उडते. शनिवारी (ता.५) रात्री उशिरा गुराखी घराकडे परतत असताना नाल्याजवळ गुराख्यांना दुर्गंधी आली. यामुळे गुराख्याने जवळ जाऊन पाहिले असता जळालेला मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला. गुराख्याने घटनेची माहिती सरपंच प्रमोद डाखळे यांना दिली.
सरपंचाने हिंगणा पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक महाजन ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्या केलेल्या व्यक्तीने अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ टाकून जाळून घेतल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्याची बॅग परिसरातील झाडाला लटकवलेली होती. या बॅगमध्ये 'सुसाईड नोट' आढळून आली. पत्नी वारंवार धमकी देत असल्याने त्रस्त झाल्याचे 'सुसाईड नोट'मध्ये लिहून ठेवले आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली.
0 Comments