हुंड्यासाठी महिलांचा छळ केला जात असल्याच्या घटना आजही अनेकदा समोर येत असतात. आता उत्तर प्रदेशमधून अशीच एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे
यूपीच्या फतेहपूर जिल्ह्यात एका विवाहित महिलेला हुंडा मागत बेदम मारहाण केली गेली. हुंड्यात म्हैस, अंगठी आणि रोख रकमेची मागणी पूर्ण न केल्याने तिची हत्या करून मृतदेह फासावर लटकवल्याचा आरोप मृत महिलेच्या पालकांनी केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत पोलिसांनी पती, सासू, सासरे यांच्यासह चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना जिल्ह्यातील कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ममरेजपूर गावातील आहे.
मृत महिलेच्या आईने सांगितलं की, तिने 15 जून 2020 रोजी तिची मुलगी उषा हिचं लग्न ममरेजपूर गावातील रहिवासी कमलेश कुमारसोबत लावलं होतं. त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी हुंडा देऊन मुलीला सासरी पाठवलं होतं. 'लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या लोकांकडून हुंड्यात म्हैस, अंगठी आणि रोख रकमेची मागणी होत होती. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने हुंड्याची मागणी पूर्ण होऊ शकली नाही.
त्यामुळे सासरचे लोक माझ्या मुलीला रोज मारहाण करून तिचा छळ करायचे. सकाळी मुलीने मला फोन करून सांगितलं, की दारूच्या नशेत तिच्या पतीने तिला खूप मारहाण केली. सासू-सासऱ्यांनीही खूप मारलंय. हे लोक मला मारून टाकतील, मला इथून लवकर घेऊन जा, असं बोलत मुलीने फोन कट केला. यानंतर संध्याकाळी मुलीच्या मृत्यूची बातमी आली', अशी माहिती पीडितेच्या आईने दिली.
0 Comments