पनवेल येथील साई वर्ल्ड पॅराडाईजच्या कार्निव्हल कार्यक्रमासाठी कुटुंबासह आलेल्या आणि मोटारसायकलवरुन भावासह कल्याण येथे परतणाऱ्या तरुणाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना तळोजा येथे घडली.
अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला आहे.
सदर अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव सय्यद आवेस इस्माईल (२२) असे असून तो कुटुंबासह कल्याणमध्ये राहण्यास होता. सय्यद आवेस आणि त्याच्या कुटुंबियांना पॅराडाईज ग्रुपच्या वतीने पनवेल येथे उभारण्यात येत असलेल्या साई वर्ल्ड पॅराडाईजमध्ये नवीन घर घ्यायचे होते. त्यामुळे आवेस आणि त्याचे कुटुंबिय पॅराडाईज ग्रुपच्या वतीने पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पॅराडाईज वर्ल्ड कार्निव्हलसाठी कल्याण येथून दोन मोटारसायकलवरुन पनवेल येथे आले होते.
कार्यक्रम संपल्यानंतर आवेस आणि त्याचा लहान भाऊ मोहम्मद हुजेफा सय्यद मोटारसायकलवरुन पनवेल-मुंब्रा हायवेने शिळफाटाच्या दिशेने निघाले होते. यावेळी पनवेल- मुंब्रा मार्गावरील आर. ए. एफ. सिग्नल जवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकल धडक दिली. त्यामुळे आवेसचा भाऊ डाव्या बाजुला तर आवेस उजव्या बाजुला रस्त्यावर पडला. याचवेळी सदर ट्रकचे चाक आवेस याच्या डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
0 Comments