महाराष्ट्रातील रस्ते अपघाताचं सत्र सुरुच आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवलीत रात्री उशिरा भीषण अपघात घडला.
एका डंपर आणि दोन दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही बाईक डंपरखाली आल्या. त्यामुळे अपघाताची तीव्रता आणखी वाढली. दोन दुचाकीस्वार या भीषण अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बोरिवली पश्चिम भागातील बोरिवली ते गोराई रोडवर हा भीषण अपघात घडला. या अपघातात बाईकवरील व्यक्तींना जबर फटका बसला. त्यांना लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नेमका हा अपघात कशामुळे घडला हे कळू शकलेलं नाही.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने अपघाताचा पंचनामा केला. रात्रीची वेळ असल्यानं फारशी वाहतूक रस्त्यावरुन सुरु नव्हती. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवला नाही. परिसरातील लोकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य केलं.
या अपघातात नेमकी चूक कुणाची, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातो आहे. या अपघातामध्ये दोन्ही दुचाकी या अपघातानंतर डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याचं दिसून आलं आहे. डंपरच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली आलेल्या दुचाकींचं नुकसान झालं असून दुचाकीस्वार अगदी थोडक्यात भीषण अपघातातून बचावलेत.
एक स्कूटी आणि रॉयल इनफिल्ड या दोन बाईक डंपरला डाव्या बाजूने विचित्रपणे धडकल्या. यातील स्कूटी ही सरळ रेषेतच डंपरच्या आतमध्ये अडकली गेली होती. तर बुलेट डंपरच्या चाकाखाली आली. यात स्कूटीसह रॉयल इनफिल्ड या दोन्ही दुचाकींचं मोठं नुकसान झालं होतं.
या अपघातानंतर काही काळ अपघातस्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान पोलिसांनी लगेचच अपघाताप्रकरणी गंभीर दखल घेतली. याप्रकरणी आता पुढील तपास केला जातोय.
0 Comments