रूममध्ये सामान ठेवण्याच्या वादातून तिघांनी केली एकाची हत्या

 


कामाच्या ठिकाणी ठेका घेतल्यानंतर ठेकेदाराने मजुरांना राहण्यासाठी रूम दिला होता.रूममध्ये सामान ठेवण्याच्या किरकोळ कारणातून गुरुवारी संध्याकाळी भांडण झाले. तीन आरोपींनी २५ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून ठोशाबुक्यांनी मारहाण केली. एका आरोपीने सोबत आणलेल्या बॅगेतील चाकू काढून तरुणाच्या पोटात दोन वेळा बोकसून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वालीव पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपी विरोधात शुक्रवारी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

बिल्ड फॅब स्ट्रक्चर सिस्टम कंपनीने कामणच्या शिलोत्तर येथील रॉयल इंडस्ट्रीयल हब याठिकाणी वेअर हाऊस (गोडाऊन) बांधण्यासाठी कंत्राट घेतले होते. कंत्राटदार इंद्रजित सरकार (५०) यांनी सदर साईटवर कंपनीचे मजूर राहण्यासाठी शिलोत्तर सर्व्हे नंबर १६३, १६४ या जागेत दिलशान सिद्धिकी यांच्या मालकीच्या दोन रूममध्ये राहण्याची व्यवस्था केली. गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांचा पुतण्या जयंतो मंडल (२५) व साहिल सिद्धीकी यांच्यात रूममध्ये सामान ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून भांडण झाले. आरोपी मेहफुज सिद्धीकी, त्यांचा मुलगा साहिल आणि त्याचा मित्र राजा राजपूत यातिघांनी जयंतो याला शिवीगाळ करून ठोशाबुक्यांनी मारहाण केली. आरोपी साहिल याने सोबत आणलेल्या बॅगेतील चाकू काढून जयंतो यांच्या डाव्या बरगडीवर दोन वेळा बोकसून त्याची हत्या केली आहे. 

याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून फरार झाले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथके तयार केली असून आरोपींचा शोध घेत आहे, असे कैलास बर्व्हे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments