गॅस सिलेंडरच्या स्फोटात रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचा मृत्यु

 


चंद्रभागा पांडुरंग बिरदवडे (वय 95) व अक्षय सुरेश बिरदवडे (वय 19, दोघे रा. राणूबाई मळा, चाकण, ता. खेड) या या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. लक्ष्मीबाई परशुराम बिरदवडे (वय 75), वैष्णवी सुरेश बिरदवडे (वय 17) गीतांजली सुरेश बिरदवडे (वय 39), अंजना प्रभाकर केळकर (सर्व रा. राणूबाई मळा, चाकण) अशी यातील जखमी असलेल्या चौघांची नावे आहेत.

या प्रकरणी लक्ष्मीबाई परशुराम बिरदवडे यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार या घटनेत मृत्यू झालेल्या अक्षय सुरेश बिरदवडे (वय 19) या त्यांच्या नातवावर भा.दं. वि. कलम 304 (अ) व 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीबाई बिरदवडे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि. 21) सायंकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचा नातू अक्षय हा मोठ्या चुलत्यांच्या घरातून गॅस सिलेंडरची टाकी घेऊन आपल्या घरातील स्वयंपाक खोलीत गेला व त्याने दार लावून घेतले. गॅस सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचा वास आल्याने, घरातील अन्य कुटुंबीयांनी दाराची कडी वाजवून त्याला दार उघडण्यास सांगितले. मात्र, अक्षय स्वयंपाकाच्या खोलीची आतली कडी लावून काहीतरी करत असतानाच गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.

हा स्फोट एवढा भीषण होता कि, घराच्या भिंती  कोसळून आणि होरपळून सहा जण जखमी झाले. अक्षय स्वतः आगीत संपूर्ण होरपळला होता. घराच्या भिंतीं कोसळल्याने त्याखाली अडकून चंद्रभागा बिरदवडे यांचा आणि होरपळलेल्या अक्षय या दोघांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान बुधवारी रात्रीच मृत्यू झाला. चाकण पोलिसांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अक्षय याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे व पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments