सोयाबीन चोरल्याच्या संशयावरून चंद्रपूर येथे दोघाजणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या दोघांना हातपाय बांधून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यांनी एवढ्यावरच न थांबता या दोघांना प्लास्टिकच्या पाईपाने बेदम मारहाण केली.
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडिओ बघून पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वरोरा येथील विनोद श्रावण देठे यांची आष्टी येथे सतरा एकर शेती आहे. या शेतात शेड बांधण्यात आलेला आहे. यामध्ये शेतीची अवजारे तसेच सोयाबीनचा साठा करून ठेवला होता. देठे शेतात गेले असता त्यांना सोयाबीन कमी झालेले दिसले. ठेवलेल्या सोयाबीनमधील अंदाजे 10 क्विंटल सोयाबीन चोरीला गेल्याचे देठे यांचा लक्षात आले.
दरम्यान त्याचवेळी संदीप रागीट व मोहन ठेंगणे हे दोघे जवळच दुचाकीने जाताना दिसले. त्या दोघांनी शेतातील सोयाबीन चोरी केल्याचा संशय आल्यामुळे देठे यांनी त्या दोघांना हात-पाय बांधून मारहाण केली. त्यानंतर देठे यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमात वायरल झाला. व्हिडिओमध्ये देठे यांनी या दोघांना अमानुषपणे मारहाण केल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या देठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत.
0 Comments