शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

 


एरंडोल येथून जवळच असलेल्‍या आडगाव येथील एका शेतकऱ्याने शेतात विष घेऊन आत्महत्या केली.

राजेंद्र भगवान पाटील (वय ५५) असे शेतकऱ्याचे  नाव आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. 

राजेंद्र पाटील हे २० डिसेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास नेहमीप्रमाणे बैलांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेले होते. तिथे त्यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांच्या शेताला लागून त्यांचा पुतण्या शेतात पाणी भरत होता. त्याला काका राजेंद्र पाटील हे जमिनीवर झोपलेले दिसले. ते का झोपले, हे पाहण्यासाठी गेला असता त्यांच्याजवळ काहीतरी विषारी बाटली पडलेली दिसली. त्यांच्या तोंडाचा विषारी औषध घेतल्याचा वास येत होता.

ताबडतोब घरी राजेंद्र पाटील यांच्या मुलाला व इतर लोकांना कळवले. त्यांना उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र कासोदा येथे घेऊन गेले असता तेथे डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना मृत घोषित केले. त्यांचे शवविच्छेदन एरंडोल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. कासोदा पोलिस ठाण्यात सुभाष भगवान पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी युवराज कोळी तपास करत आहेत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments