सांगली : देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला पडला आहे. रस्त्याच्याकडेला असणाऱ्या संरक्षण कठड्यावर भरधाव गाडी आदळून झालेल्या अपघातात बाप-लेक ठार झाले आहेत. तर चौघेजण जखमी झाले आहेत. शिराळा तालुक्यातल्या कोकरूड या ठिकाणी हा अपघात घडलाआहे. मृत आणि जखमी हे पुणे जिल्ह्यातले आहेत.शिराळा तालुक्यातल्या कोकरूड येथील वारणा नदीवरील असणाऱ्या पुलावर चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. कोकरूड-नेर्ले पुलावर असणाऱ्या संरक्षण कठड्याला भरधाव चारचाकी गाडी धडकून हा अपघात घडला आहे. या भीषण अपघातामध्ये वडील आणि चार वर्षाचा मुलगा ठार झाला आहे. महिंद्र अशोक घोगरे वय 35 आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा आरव महेंद्र घोगरे, असे ठार झालेल्या बाप-लेकाची नावे आहेत.
पुण्याच्या सासवड येथील घोगरे कुटुंब हे देवदर्शनसाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे या ठिकाणी शनिवारी सकाळच्या सुमारास निघाले होते. शिराळा तालुक्यातल्या कोकरूड मार्गे रत्नागिरीकडे जात असताना दुपारच्या सुमारास कोकरूड-नेर्ले पुलाजवळ घोगरे यांची गाडी आली असता, रस्त्याचा अंदाज आला नसल्याने चालक ऋषिकेश घोगरे यांचा गाडीवरील ताबा सुटला. ज्यामुळे गाडी रस्त्याच्याकडेला असणाऱ्या संरक्षण कुंपणावर जाऊन जोरात धडकली. धडक इतकी जोरदार होती. ज्यामध्ये चालकाच्या बाजूला बसलेले महेंद्र घोगरे व त्यांचा चार वर्षाचा मुलगा आरव घोगरे हा जागीच ठार झाला आहे. तर यामध्ये रेणुका महेंद्र घोगरे, शिवेंद्र महेंद्र घोगरे, रूपाली ऋषिकेश घोगरे आणि ऋषिकेश घोगरे हे जखमी झाले आहेत. त्यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
0 Comments