शेतातील शेड वजा घरामध्ये झोपायला गेलेल्या एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. चाफळपासून ७ किमी अंतरावर डोंगरमाथ्यावर सीताराम देसाई असलेल्या भैरेवाडी – डेरवण (ता.
पाटण) येथे शुक्रवार, दि. ९ रोजी रात्री ही घटना घडली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीताराम बबन देसाई (वय ४६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून हा खून कोणी व कशासाठी केला याचा शोध पोलिस घेत आहेत.
भैरेवाडी येथील सीताराम देसाई यांनी गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर टेक नावाच्या शिवारात शेतघर बांधले आहे. या शेत घरात त्यांची
जनावरे बांधलेली असतात. देसाई हे नेहमी प्रमाणे गावातील घरी कुटुंबासह जेवण करून रात्री ९ ते १० च्या दरम्यान एकटेच झोपण्यासाठी त्या शेतघरात गेले. दरम्यान, रात्रीच्या सुमारास अज्ञातानी देसाई यांना घराच्या बाहेर बोलावून दगड, विटानी हल्ला करत त्यांचा खून केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच खून करणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई केली जाईल, असे मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि उत्तम भापकर यांनी सांगितले.
घटनास्थळी ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचरण करण्यात आले होते. पाटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड, संतोष तासगावकर, सपोनि उत्तम भापकर, अजित पाटील, चाफळ पोलिस दूरक्षेत्राचे मनोहर सुर्वे, सिध्दनाथ शेडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भैरेवाडी हे गाव डेरवण ग्रामपंचायतमध्ये येत असून सध्या या ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे. या घटनेमुळे निवडणुकीचे वातावरण देखील ढवळून निघाले आहे. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चाफळ पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
0 Comments