अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचून पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत पत्नीविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून अटक केली.
नामदेव (३०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर विद्या असे आरोपी पत्नीचे नाव आहे. न्यायालयाने विद्याला ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव हा एका बंगल्यावर शेतीची काम करतो. त्याचे विद्यासोबत १० वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे दोघेही पती-पत्नी तणावात वावरत होते. २ डिसेंबरला विद्याने पोलिसांना माहिती दिली की पती नामदेव याने आत्महत्या केली आहे. मौद्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी घटनास्थळावर पाहणी केली असता संशय आला. त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. खराबे यांनी विद्या हिला ताब्यात घेतले आणि तिची कसून चौकशी केली असता तिने पतीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. विद्याचे घरासमोर असलेल्या पानठेला चालक किरणशी अनैतिक संबंध होते. पती कामावर गेल्यानंतर किरण हा विद्याच्या घरी येत होता. त्याची कुणकुण नामदेव याला लागली होती. त्यामुळे घरात अनेकदा पती-पत्नीत वाद होत होते. नामदेव विद्याला किरणशी असलेल्या अनैतिक संबंधावरून मारहाण करीत होता.
0 Comments