मुलाने संपत्तीसाठी केली आईची हत्या

 


संपत्तीसाठी आईची हत्या करून  तिच्या मृतदेहाची विल्हेवाट माथेरानच्या नदीत लावणाऱ्या मुलाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

सचिन कपूर असे मुलाचे नाव असून, त्याने या गुन्ह्यात  त्याच्या नोकर, छोटू उर्फ लालूकुमार मंडल याची मदत घेतली. मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली होती.

वीना कपूर असे मृत आईचे नाव असून, तिचे वय 74 वर्षे होते. मायलेकामध्ये मालमत्तेवरून 6 डिसेंबर रोजी वाद झाला, त्यानंतर आरोपी मुलगा सचिन कपूरला राग आला, त्याला राग अनावर झाल्याने त्याने नोकराशी हातमिळवणी करून स्वतःच्या आईची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी आधी वीना यांचे हात-पाय बांधले. त्यानंतर बेसबॉलच्या बॅटने आईला मारहाण केली, मारहाणीमुळे वीनाचा मृत्यू झाला. 

हत्या केल्यानंतर, सचिन आणि छोटूने पुरावे नष्ट करण्यासाठी एका बॉक्समध्ये आईचा मृतदेह भरला. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून बॉक्स व्यवस्थित बंद केला. सचिनने घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता, पण त्याने घरातील सीसीटीव्ही फुटेज असलेले डीव्हीआर काढले आणि तेही नष्ट केले. नंतर आरोपींनी आईचा मृतदेह बॉक्समध्ये पॅक करून मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील माथेरान भागात असलेल्या नदीत मृतदेह आणि डीव्हीआर फेकून दिला.

त्यानंतर आरोपी मुलाने आई बेपत्ता असल्याची तक्रार 6 डिसेंबर रोजी जुहू पोलीस ठाण्यात केली.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्यांना सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघे एक मोठी पेटी इकडे तिकडे हलवत असल्याचे दिसले.
त्यानंतर या दोघांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा मान्य केला.
आता पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम IPC 302, 201 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


Post a Comment

0 Comments