कळवण तालुक्यातील वेरुळे येथील उंबरदरी शिवारातील वृद्ध दाम्पत्याची कुन्हाडीचा घाव घालत निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी (दि. ३) उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तीन तासांत खुनाचा उलगडा केला असून, मयत कोल्हे दाम्पत्याचा नातू असलेला काळू ऊर्फ राजाराम हरी कोल्हे हाच खरा मारेकरी असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी त्यास अटक करीत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वेरुळे येथील वयोवृद्ध दाम्पत्य नारायण मोहन कोल्हे व त्यांची पत्नी सखूबाई कोल्हे यांचा कुऱ्हाडीने घाव घालत खून करण्यात आला होता. त्यानंतर घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप व उपविभागीय पोलिस अधिकारी तांबे यांनी यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अगोदर या दाम्पत्याच्या नेहमी सहवासात राहणारा त्यांचा भाचा रामदास भोये याची चौकशी केली. त्यावेळी आजी-आजोबांना भेटण्यासाठी वरखेडा येथील त्यांचा नातू काळूदेखील आला असल्याची माहिती मिळाली.
रात्री उशिरापर्यंत काळू कोल्हे याची चौकशी केल्यानंतर त्यानेच आजी-आजोबांचा खून केला असल्याचा कबुली जबाब दिला असल्याची माहिती अभोणा पोलिस ठाण्याने दिली आहे. वृद्ध दाम्पत्याकडून वेळोवेळी खर्चासाठी पैसे दिले जात नाहीत, तसेच भेदभाव करतात याचा राग डोक्यात ठेवत नातवाने त्यांच्यावर कु-हाडीचे घाव घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नातवास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अभोणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.
0 Comments