शहरातील मार्केट यार्ड परिसरात संशयास्पदरीत्या फिरणार्या एका अल्पवयीनाला शहर पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. या चौकशीत त्याच्याकडे चोरीच्या सहा दुचाकी मिळून आल्या.
जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी मोठ्या प्रमाणावर चोरीला जात आहेत. त्यामुळे या घटनांचा अभ्यास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार शहर पोलिसांचे पथक मार्केट यार्ड परिसरात रेकी करत गस्त घालत असताना त्यांना एक अल्पवयीन मुलगा संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, तो अट्टल दुचाकी चोर असल्याचे निष्पन्न झाले. दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक, भिगवणच्या हद्दीतून दोन तर बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी त्याने चोरल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
चोरीच्या या दुचाकी त्याने नातेवाइकांच्या घरी ठेवल्या होत्या. या दुचाकींची विक्री करण्याच्या तो तयारीत होता. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांच्या घरी जात सुमारे तीन लाख रुपयांच्या दुचाकी हस्तगत केल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, प्रकाश वाघमारे, हवालदार रामचंद्र शिंदे, दशरथ कोळेकर, अशोक सिताप, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, शाहू राणे आदींनी केली.
0 Comments