महिलेचा खून करणारा फरारी मारेकरी अटकेत

 


सविंदणे -बाभूळसर (ता. शिरुर) येथे एका महिलेच्या खूनप्रकरणातील फरार आरोपीस शिरूर पोलिसांनी कुठलाही मागमुस नसताना शिताफीने तपास करीत अवघ्या 12 दिवसांत गजाआड केले. आतिश संतोष प्रधान (वय 20, रा.

जोडवालसा, ता. भोकरदन, जि. जालना), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. महिला संगिता रमेश आडके (वय 48), असे खून केलेल्या महिलेचे नाव आहे.

(दि.9) रात्री मौजे बाभुळसर येथील खंडोबा मंदिराच्या मागे भीमा नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळला. यानंतर तिला पात्रात ढकलून दिले. शिरूर पोलीस स्टेशन येथे (दि.10) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी घटनास्थळी जात पथकांना सूचना दिल्या. नदीजवळील परिसर बाभळीने व्यापलेला आहे. त्यामुळे गुन्ह्याची उकल करणे आव्हानात्मक होते. पोलीस निरीक्षक राऊत यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदीप यादव, अभिजीत पवार, एकनाथ पाटील यांचे पथक तयार करून तपास सुरू केला.

महिलेचे नातेवाईक, गावातील इतर नागरिक घटनेच्यावेळी आजूबाजूस नागरिकाकडे चौकशी केली. परिसरातील मोबाइल टॉवरचा डम डाटा घेत त्यावर तांत्रिक अभ्यास करून आरोपीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सुगावा लागत नव्हता. दरम्यान, ग्रामपंचायतीने बसविलेले तसेच खासगी लोकांनी बसविलेले सर्व सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेतले. पथकाने बारकाईने पाहणी केली असता गावामध्ये एक व्यक्तीची हालचाल संशयास्पद दिसली.

त्याची ओळख पटविण्याकरिता गावात चौकशी केली असता, ही व्यक्‍ती गावातील राहणारा नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गावाजवळ या ऊसतोड कामगारांकडे माहिती घेतली. तो घटनेनंतर गावातून निघून गेल्याचे समजले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक जालना येथे रवाना झाले. पथकाने आरोपीस शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली. त्याने दारूच्या नशेत संगीता आडके हिचा खून करून तिला नदीपात्रात ढकलून दिल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश मिट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी, यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप यादव, अभिजीत पवार, एकनाथ पाटील, स्नेहल चरापले, नाथसाहेब जगताप, रघुनाथ हाळनोर, योगेश गुंड, प्रवीण पिठले, पोलीस मित्र दीपक बढे, राहुल चौघुले यांनी केलेली आहे. आरोपीस (दि.21) रोजी अटक केली.


Post a Comment

0 Comments