कंदलगाव (ता. करवीर) येथून रविवारपासून (दि. ४) बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह कंदलगावातील एका विहिरीत आज, बुधवारी (दि.सकाळी आढळला. सिद्धी बाळू पोवार (वय १४, सध्या रा. कंदलगाव, मूळ रा. नंद्याळ, ता. कागल) असे मृत मुलीचे नाव आहे. सिद्धी हिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गोकुळ शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंदलगाव येथील सिद्धी पोवार ही १४ वर्षीय मुलगी रविवारी रात्री आठच्या सुमारास घरात कोणाला काहीच न सांगता निघून गेली. मुलीचा शोध घेऊन अखेर तिच्या वडिलांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. पालक आणि पोलिसांकडून शोध सुरू असतानाच, बुधवारी सकाळी सिद्धीचा मृतदेह कंदलगावपासून जवळच असलेल्या एका विहिरीत आढळला.
विहिरीत मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवून तो उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आला. तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सिद्धीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने पालकांना धक्का बसला. दरम्यान सिद्धीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.
0 Comments